Thursday, April 22, 2021

याच डायरीत


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. ११४-११५ .
नव्या कोर्‍या डायरीत
अगदी सुरवातीच्या पानावर
तिचा पत्ता
हिरव्या शाईने नोंदताना
केवढा थरारलो...
पहिलं फूल येताना
थरारत असेल झाड
तसा.

नंतर या डायरीत 
मित्र-मैत्रिणींचे,
सग्यासोयऱ्यांचे पत्ते नोंदले:
एखाद्या मुलीने काढावी रांगोळी 
तेवढ्या आनंदाने.
प्रत्येक वेळी नवा पत्ता 
नवा आनंद देऊन गेला.

नंतर नंतर तर
सिमेंटवाले, खडीवाले,
गवंडी, सुतार, प्लंबर 
यांचेही पत्ते नोंदवावे लागले 
तेव्हा एखादा वेठबिगार
झाल्यासारखे वाटले.

अलीकडे तर
याच डायरीत नोंदवावे लागत आहेत
धूर्त राजकारण्यांचे,
भ्रष्ट अधिकाऱ्यांचे
आणि चलाख वकिलांचे पत्ते.

आज तर
मनावर दगड ठेवून 
थरथरत्या हाताने लिहावा लागला 
एका कुविख्यात गुंडाचा पत्ता 
याच डायरीत!


- oOo -


पिंजरा


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. १०८-१०९.
आकाशात झेपावण्यासाठी पंख उचलले 
आणि थोडं उडतो न उडतो तोच 
कशावर तरी आदळून 
फडफडत खाली कोसळलो,
रक्ताळलो.

पंख झटकून लगेचच सावरलो; 
इकडेतिकडं, वरखाली 
भांबावून पाहत राहिलो, 
पण कशावर आदळलो 
हे लक्षातच येईना.

मग पुढयात येऊन पडली 
काही फळं आणि पाणी. 
मुकाट खाल्लं, 
पाणी प्यायलो.

दूर रानातून झऱ्याचं गाणं ऐकू येत होतं; 
ऐकू येत होतं वाऱ्याचं वाहणं; 
बांधवांनी घातलेली शीळ 
अस्वस्थ करीत होती.

पुन्हा पंख पसरले
आणि सर्व शक्तीनिशी घेतली झेप. 
पुन्हा तेच. 
या वेळी तर भोवळ येऊनच पडलो, 
तडफडलो.

नंतर पुढं पुन्हा पुन्हा 
आभाळात झेपावण्याचे
यत्न करीत राहिलो 
आणि पुन्हा पुन्हा तसाच 
जिथून उडालो 
तिथंच आदळलो.

माझ्याही नकळत माझ्याभोवती 
एक अदृश्य पिंजरा 
भरभक्कम होत चाललाय 
हे आता आता 
माझ्या लक्षात येऊ लागलंय.


- oOo -


आभाळाचा भार


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. १०२.
असं हे जगापासून तुटणं 
आणि आतल्या आत फुटणं;
पाचोळ्यासारखं कुठल्याही वाऱ्यावर 
उडत जाणं. 
रक्ताळून धुळीत माखणं 
आणि सताड डोळ्यांनी
उजाड आकाशाकडं टकटक पाहणं.

काय आहे हे सगळं? 
सगळेच जर त्यांचे त्यांचे त्यांच्यात्यांच्यात. 
बायकोपोरांना घेऊन ये जा करीत आहेत. 
एकमेकांना हसून निरोप 
आणि पुन्हा येण्यासाठी 
आमंत्रण देत आहेत.

ते आभाळाखालून जातात 
पण आभाळाकडं बघत नाहीत; 
ते झाडांखालून जातात 
पण ओळख असल्यागत हसत नाहीत; 
पक्ष्यांचं गाणं तर त्यांच्या गावाला 
नावालाही असत नाही.

मग हे सगळं
मलाच कां करावं लागत आहे? 
झाडांचा, पक्ष्यांचा फडफडाट 
मलाच कां पाहावा लागत आहे? 
या अफाट आभाळाचा भार 
मला एकट्यालाच का 
वाहावा लागत आहे?


- oOo -


मोराची गोष्ट


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. ९०.
ते या थराला जातील
असं मोराला मुळीच वाटलं नाही; 
फक्त कुणीतरी 
आपला द्वेष करत आहे 
याची कुणकुण त्याला लागली होती.

मोराचा तुरा
आणि मोराचा पिसारा
जसजसा अरण्यभर गाजू लागला 
तसतसा त्यांनी 
मोराचा द्वेष तीव्र केला. 
मोराचा पिसारा कापण्याचाही 
प्रयत्न झाला.

एवढं करूनही
मोराचा रुबाब 
जराही कमी होत नाही 
हे पाहून त्यांनी 
संपूर्ण जंगलालाच आग लावून दिली 
भडकत्या वणव्यात मोर 
पिसाऱ्यासकट पेटून 
तडफडून 
मरावा म्हणून.

यातूनही मोर जरी 
सहीसलामत राहिला तरी
जंगलातले
असंख्य जीव मात्र
हकनाक
होरपळून मेले.


- oOo -


कुणाला कळवायचं?


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. ८६.
तिकडे एक उजाड खडक
फुटलेल्या डोळ्यांतून 
एकसारखा पाणी गाळतोय;
"माझ्यासाठी काहीतरी कर!' 
निरोपावर निरोप येताहेत त्याचे.

वासरांपासून तुटलेली एक गाय 
उन्हाच्या हाहाकारात अगदी एकटी चरत आहे; 
तिच्या काळजातला दुष्काळ तर 
मला अनेकांनी अनेकदा कळवला आहे.

धुळीच्या फाटक्या पदराखाली 
चार खुरट रोपांना जोजवणारी बाभळ: 
तिच्या मुळ्यांना कोरड पडलेली. 
पाण्यासाठी सांगावा धाडलाय तिनं.

नुक्तंच उगवलेलं आपलं कोवळं गाणं 
हळू हळू कोमेजत चाललंय 
असं एका चिमणीनं 
वाऱ्याच्याबरोबर 
कळवळून कळवलंय.

आणि इकडे माझ्या पिकावर
टोळधाड येऊन 
पीक होत्याचं नव्हतं होतंय, 
आभाळात मावत नाहीय 
पिकाचा आक्रोश 
हे मी
कुणाला कळवायचं?


- oOo -


जंगलग्रस्त


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. ८२.
खूप दिवसांनी 
मी आज शेतावर आलोय. 
बांधावरून पाहतोय 
दूरवर पसरलेलं माझं शेत 
जे अलिकडच्या काळात झालंय 
जंगलग्रस्त.

सर्वदूर मातीच्या छातीवर 
बेमुर्वतपणे उभी आहेत 
खैर-बाभळांची टोळकी 
काटेरी दातांनी खदखदाट करीत.

टोकदार तलवारी घेऊन आलेल्या 
घुसखोर घायपाती 
हळूहळू पाय टाकत 
वेढा देत आहेत शेताला.

हे पिसाट गवत
शेतभर पसरत चाललं आहे 
एखाद्या जीवघेण्या
रोगासारखं.

अंगाखांद्यावर जखमांनी
थरकापणारी डाळिंबाची तुरळक झाडं 
आणि चिंधाळलेल्या लुगड्यात 
लाज लपवीत 
सीताफळ तेवढी 
कशीबशी उभी आहे.

आता मला
कुऱ्हाड, नांगर वगैरे अवजारांची
जमवाजमव
करावीच लागेल!


- oOo -


आभाळात फिरणारे पाय


तळपाणी

कवितासंग्रह: तळपाणी
कवी: उत्तम कोळगावकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती (२०००)
पृ. ७४.
झोपडी पार मोडली आहे:
पावसाळा सुरू झाला म्हणजे
घरभर पाणीच पाणी...
तर गवतपाला किंवा उसाची पानड आणून 
झोपडी शाकारली पाहिजे.

बैल म्हातारा झाला आहे
आणि तो काहीच कामाचा
राह्यला नाही म्हणू
वाऱ्यावर थोडाच सोडून देता येईल?
त्याच्यासाठी निदान
रोजी एखाद्या तरी
हिरव्या किंवा नाहीच जमलं तर 
निदान वाळल्या चाऱ्याच्या पेंढीची
सोय करायला हवी.

कोणत्या वनस्पतीचा रस टाकला म्हणजे 
गाईचे गळणारे डोळे थांबतील 
हे वरल्या गल्लीतल्या
कुबड्या बुटाजीला विचारून घेतलं पाहिजे..

डोक्याबरोबर वाढलेल्या
आंब्याच्या झाडाकडं आता पाहवत नाही.
पानं वळून दिवसेंदिवस 
निस्तेज होत आहेत. 
तर या झाडानं 
थोडाफार जोम धरावा म्हणून 
दिवसाआड का होईना पण त्याला 
चारदोन घागरी पाणी 
दिलं पाहिजे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
हे सगळं करण्यासाठी प्रथम 
माझे आभाळात फिरणारे पाय 
मातीवर आले पाहिजेत.


- oOo -